रत्नागिरी - मोदी सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून सुरू आहे. असं असताना आता भाजपाचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. कोरोना काळात पंतप्रधान कार्यालयाचा काहीच उपयोग नसून, कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी,अशी मागणी स्वामी यांनी केली आहे. दरम्यान स्वामी यांच्या या वक्तव्याला आपाल पाठिंबा असल्याचे उदय सामंत यांनी म्हंटले आहे.
उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले की, कोणाकडे जबाबदारी द्यायची हा भाजपाचा अंतर्गत विषय आहे. मात्र महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच ठामपणे सांगेन की, नितीन गडकरींसारखं नेतृत्व जर तिथे मिळालं तर खरोखरच कोरोनाला आळा घालण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो. सुब्रमण्यम स्वामी यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे.
'चंद्रकांत पाटील काय बोलतात त्यापेक्षा मुख्यमंत्री काय म्हणाले ते महत्त्वाचे'
मराठा आरक्षणावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी उदय सामंत म्हणाले की, आरक्षणाच्या बाबतीत चंद्रकांत पाटील काय बोलतात, यापेक्षा मुख्यमंत्री काय बोलले हे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने कशापद्धतीने कारवाई केली, त्याची श्वेतपत्रिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, संभाजीराजे यांची मुलाखत महत्त्वाची आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी कोणालाच दोष देत नाही. मी या सर्व प्रक्रियेमध्ये होतो, पूर्वीच्या सरकारमध्ये देखील शिवसेना-भाजप होती, त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. या सरकारने देखील चांगली भूमिका घेतली, केंद्र सरकारने देखील प्रयत्न केले. पण आमच्या मनामध्ये जी शंका आहे ती अशी की, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत असताना महाराष्ट्राला एक निर्णय दिला, तर अन्य राज्यांना वेगळा निर्णय दिला आहे. ही शंका स्पष्ट झाल्यास माला वाटतं की मराठा समाजाला न्याय मिळेल असेही यावेळी सामंत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील -संजय काकडे