रत्नागिरी - काही ठराविक मार्गावर रेल्वे चालवायला परवानगी दिल्यानंतर आज दिल्ली-मडगाव या विशेष रेल्वेने जवळपास 800 ते 900 प्रवासी रत्नागिरीत उतरले. बडोदा किंवा इतर भागातून आलेले प्रवासी देखील या ठिकाणीउतरले. रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरलेले प्रवासी हे सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणाचे आहेत. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे यातील 2 प्रवासी हे पुणे येथील देखील आहेत. या साऱ्या प्रवाशांची तालुकानिहाय यादी करत त्यांना एसटी बसने तालुक्याच्या ठिकाणी सोडण्यात आले.
त्याच ठिकाणी त्यांची वैद्यकीय चाचणी घेत त्याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणावर नागरिक हे दाखल होत आहेत. खासगी गाडी करून देखील अनेक जण आपल्या मुळगावी दाखल झालेत. दरम्यान, पुढील दोन दिवसात आणखी दोन ट्रेन या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर येणार आहेत आणि त्या ठिकाणाहून सुटणार देखील आहेत.