रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. मंडणगड तालुक्यातील शिगवण गावातील मयुरी जगताप यांचेही घर या वादळात उध्वस्त झाले. मयुरी जगताप या आशा स्वयंसेविका आहेत. त्यांचे पती महेश जगताप हे अपंग असून घरातील सर्व लोकांची जबाबदारी मयुरी जगताप यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे घर उध्वस्त झालेल्या आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने लवकर मदत करावी, अशी अपेक्षा मयुरी जगताप यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा... ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीत... खबरदारी म्हणून कलम 144 लागू
मयुरी जगताप यांच्या तुटपुंज्या मानधनावरच त्यांचा संसार चालतो. मयुरी जगताप यांनी या वर्षीच 2 लाख रुपये कर्ज काढून घराची डागडुजी केली होती. आपल्या छोट्याशा संसारात मयुरी सुखी होत्या. मात्र, निसर्ग चक्रीवादळाने जगताप यांचे घर उद्धवस्त झाले. घराच्या भिंती पडल्या, छत उडाले, धान्य भिजले. अख्खा संसार या वादळात जमीनदोस्त गेला. वादळाच्या दिवशी शेजारच्या घरी या कुटुंबाने आश्रय घेतला. त्यानंतर मागील काही दिवस हे कुटुंब गावातील शाळेत राहत आहेत. मात्र, शाळेची देखील वादळामुळे दुरावस्था झाली आहे.
सध्या हे जगताप कुटुंब फक्त तीखट-मीठ खाऊन दिवस काढत आहे. थोडेसं धान्य वगळता इतर कोणतीही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. कर्ज काढून उभे केलेले घर वादळात उध्वस्त झाल्याने आता जगायचे तरी कसे, असा प्रश्न मयुरी जगताप यांच्यासमोर उभा ठाकला आहे