रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. दरम्यान, मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील गोळप येथील मानेवाडीत भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामुळे 6 घरांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान प्रशासनाकडून दोन घरांमधील 4 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्यास सांगण्यात आले आहे.
10 ते 15 फूट खचली जमीन
जिल्ह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस बरसत आहे. आज पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र असे असले मुसळधारपणे बरसलेल्या पावसाने ठिकठिकाणी दाणादाण उडवून दिली आहे. दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील मानेवाडीत भूस्खलन झाले असून काही घरांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून दोन घरांमधील 4 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्यास सांगितले आहे.
'ठोस आश्वासन द्यावे'
या 4 कुटुंबांमध्ये 20 जण राहतात. या ठिकाणी ओहळापासूनची अंदाजे 200 फूट जमीन जवळपास 10 ते 15 फूट इतकी खचली आहे. यामध्ये नारळ, सुपारी, केळ, आंबा आणि फणसाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. पण, नागरिकांनी मात्र प्रशासनाकडून ठोस असे आश्वासन द्यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, पावसाचा जोर असाच राहिल्यास या घरांना धोका वाढण्याची शक्यता आहे.