रत्नागिरी - जिल्ह्यात देखील सध्या पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. कालपासून(मंगळवार) जिल्ह्यात सर्वदूर वरूणराजा कोसळत असून, नद्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी नद्यांच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं भातशेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. लांजा तालुक्यातील भांबेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं मुचकुंदी नदीला पूर आला. त्यामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर, गणपतीपुळे येथे वादळी-वाऱ्यासह पाऊस झाल्यानं घरावर झाड कोसळले. पण, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सध्याच्या घडीला सह्याद्रीच्या पायथ्याला असलेल्या गावांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. तर, समुद्र सपाटीपासून जवळ असलेल्या परिसरात पावसाचा जोर तुलनेनं कमी असल्याचं दिसून येत आहे. सध्याच्या पावसाच्या या स्थितीमुळे पिकलेली भात शेती संकटात सापडली असून, शेतकरी वर्गातून मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.