रत्नागिरी - जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने जोर धरला आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच शहराच्या दुसऱ्या बाजूने वाहणाऱ्या नारिंगी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे खेड बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जगबुडी नदी खेड शहरालगत वाहते. नदीचा उगम सह्याद्रीच्या खोऱ्यातील बांद्रीपट्यात होतो. गेले चार दिवस या भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या नदीची इशारा पातळी ६ मीटर तर, धोका पातळी ७ मीटर आहे. गुरुवारी दिवसभर सह्याद्रीच्या खोऱ्यात संततधार पाऊस सुरू असल्याने सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ६.५ मीटर पर्यंत पोहचली. त्यानंतर नदीने धोक्याची पातळी ओलांडली.
हेही वाचा - 'यंदा जलप्रलय होऊ देणार नाही, नियंत्रणासाठी महाराष्ट्र, कर्नाटकची त्रिस्तरीय समिती'
सध्या या नदीच्या पाण्याचा प्रवाह साडेसात मीटर उंचीने वाहत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर एका बाजूला जगबुडी नदीचे पाणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला असलेल्या नारिंगी नदीच्या पाण्याचीही पातळी वाढू लागली आहे. बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने खेड शहरातील व्यापारी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.