रत्नागिरी - फळांचा राजा 'हापूस आंबा’ रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेत दाखल झाला आहे. रत्नागिरीतल्याच शेतकऱ्यांच्या बागेतील हा आंबा आहे. यावर्षी काहीसा उशिरा आंबा बाजारपेठेत दाखल झाला आहे. मात्र, असे असले तरी या आंब्याला दरही चागला मिळत आहे.
लांबलेला पाऊस आणि हवामानातील बदल यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर आहे. त्यामुळेच दरवर्षी डिसेंबर महिन्यात स्थानिक बाजारात दाखल होणारा आंबा यावर्षी मात्र जानेवारी महिन्याच्या अखेरीस दाखल झाला. हंगामातील पहिल्या आंब्याची चव चाखण्यासाठी त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या खवय्यांची प्रतिक्षा संपली असली तरी त्यांच्या खिशाला थोडा चाट मात्र पडणार आहे. कारण हंगामात पहिल्यांदाच दाखल झालेला हा आंबा 2800 ते 3000 रुपये इतका डझन आहे. मात्र, एवढा दर असला तरी सुद्धा हापूस आंब्याला मागणी चांगली असल्याचे विक्रेते सांगतात.