रत्नागिरी : गणेशोत्सवात महिला वर्ग ज्याची आतुरतेने वाट बघत असतो त्या गौरीमातेचे आज(मंगळवार) जिल्ह्यात ठिकठिकाणी आगमन करण्यात आले. यावर्षी कोरोनाचं संकट असल्याने ढोल-ताशांच्या गजराशिवाय अगदी साध्या पद्धतीने पण भक्तिमय वातावरणात गौरीमातेची गाणी म्हणत आगमन करण्यात आले.
कोकणात महिला गौरी आगमन अनोख्या पद्धतीने साजरा करतात. येथे पाणवठ्यावरुन गौरी घरी आणण्याची परंपरा आहे. कोकणात गौरीला ग्रामीण भाषेत 'गवर' असेही म्हटले जाते. जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात आज अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईचे आगमन झाले. ग्रामीण भागात खड्याची गवर तसेच मुखवट्याची गवर आणण्याची परंपरा आहे. गौरीच्या मुखवट्यासोबत पाणवठ्यावरच्या खड्यांच्या गौरी ताम्हनात घरी आणल्या जातात. काही ठिकाणी तेरड्याचीही गवर असते. या गौरी घरी आणत असताना खास गौरीची गाणी म्हटली जातात. गौरीचा मुखवटा पाणवठ्यावरुन घरापर्यंत सुहासिनी घेऊन येतात.
घराच्या उंबऱ्यावर आलेल्या गौरीचे स्वागत होते. तर, गौरी आगमनाने गणपती बाप्पाच्या सणात आणखी भर पडते. दरम्यान यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने गौरीमातेचं आगमन झालं मात्र, महिला वर्गाचा उत्साह काही कमी झालेला नाही. कोकणातील अनेक गावातील घरामध्ये लाकडाच्या पूर्णाकृती गौरी असतात. दरवर्षी या गौरींना नव्या वस्त्रालंकारानी सजवले जाते. अनेक घरांमध्ये गौरीचे वर्षानुवर्षाचे खऱ्या सोन्याचे दागिनेही असतात. कोकणात आज म्हणजेच आगमनाच्या दिवशी गौरीसाठी गोड नैवेद्य केला जातो. तर, उद्या गौरी पूजनाच्या दिवशी कोकणात अनेक ठिकाणी तिखट सण अर्थात गौरीला तिखट नैवेद्य दाखवला जातो. आज व उद्या रात्रभर गौराईचा जागर केला जाणार आहे.