रत्नागिरी - जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुसता धुमाकूळ घातला असून, शेतात लावलेले पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी 'खूप नासाडी केली आता तरी विश्रांती घे', अशी आर्त विनवणी पावसाला करीत आहेत. यातच रविवारपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतातील पावसाच्या तडाख्यात वाचलेले पीक कापणीला घेतले आहे.
परतीच्या पावसाने गेले 15 दिवस धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातला शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले पीक या पावसामुळे वाया गेले आहे. डौलाने फडकणारे पीकही या पावसामुळे जमिनीकडे झेपावल्याने वर्षभराची मेहनत वाया जाते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, रविवारपासून पावसाने उसंत घेतल्याने बळीराजाने पुन्हा मोठ्या जोमाने शेतातील जे काही पीक या पावसाच्या तडाख्यातून बचावले, ते कापण्यासाठी शेतात जीवाचे रान करीत आहेत. त्यामुळे कोकणातल्या या शेतकऱ्यांसाठी कसली दिवाळी अन कसलं काय अशी परिस्थिती आहे. आधीच 50 टक्के पीक वाया गेले आहे, ज्या ठिकाणी 20 मण भात पिकायचा तिथे आता 10 मण तरी पिकेल की नाही, याची शाश्वती नाही. जर, पुन्हा पाऊस आला तर आहे नाही ते सर्वच पीक वाया जाणार आहे. त्यामुळे पावसा पुढचे काही दिवस तरी येऊ नकोस, अशी आर्त विनवणी शेतकरी परमेश्वराकडे करत आहे.
हेही वाचा - वादळाचा धोका टळल्यानंतरही मासेमारीवर परिणाम; मच्छिमारांना 30 ते 40 कोटींचा फटका
हेही वाचा - दिवाळी खरेदीवर पावसाचे सावट, विक्रेत्यांना फटका