रत्नागिरी - लांजा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड धावून आले आहेत. लाड यांनी लांजा तालुक्यातील देवधे कोविड केअर सेंटरसाठी एक अद्ययावत रुग्णवाहिका, ऑक्सिजन मशीन, स्टीमर उपलब्ध करून दिले आहेत. कोरोनाबाधितांना हळदीचे दूध देण्याची व्यवस्था देखील त्यांनी केली आहे. सोमवारी या उपक्रमांचा देवधे कोविड सेंटर येथे शुभारंभ करण्यात आला.
रुग्णवाहिके अभावी होते रुग्णांची हेळसांड -
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात हे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लांजा तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही. खासगी रुग्णवाहिका चालक अव्वाच्या-सव्वा पैसे आकारतात. सर्वसामान्य रुग्णांना ते परवडत नाही व त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. ही गैरसोय लक्षात घेऊन जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तसेच नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी 'ना नफा ना तोटा' तत्वावर लांजा तालुक्यासाठी एक अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
सध्या रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने अनेकांनी प्राण गमावले आहेत. देवधे येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अविनाश लाड यांनी 'ऑक्सिजन सेरेमीटर मशीन' उपलब्ध करून दिली आहे. तसेच रुग्णांना वाफ घेण्यासाठी स्टीमर आणि रोज रात्री हळदीचं दूध देण्याची व्यवस्था काँग्रेसकडून करण्यात आली. अविनाश लाड देवधे कोविड सेंटरच्या मदतीसाठी धावून आल्याने तालुका प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहेत.
यावेळी माजी आमदार हुसनबानो खलिफे, माजी सभापती श्रीकृष्ण हेगिष्ठे, तहसीलदार समाधान गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी मारुती कोरे, डॉ. संकेत पेडणेकर आदी उपस्थित होते.