रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर सुरु असलेल्या अवैध एलईडी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या मत्स्यदुष्काळामुळे शिमगा सणाच्या अगोदरपासूनच मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घ्यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी लाखो रुपयांचा तोटा सहन करून पुढील वर्षी पुन्हा या उद्योगात उतरायचे का नाही, याचाच विचार येथील मच्छीमार बांधवांना पडला आहे.
या मोसमात १ ऑगस्ट २०१८ पासून सुरु झालेला हा मासळी उद्योग सुरुवातीपासूनच संकटात आहे. एलईडी लाईट वापरून अवैधरित्या चाललेल्या या मासेमारीला कोणाकडूनच पायबंद बसत नाही. पारंपरिक मच्छिमारांकडून यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु एलईडी फिशिंग करणारे मच्छीमार कोणालाच धूप जाळत नाहीत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील मच्छिमारांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन बंदीचे आदेश देण्यास सांगितले. तरी तात्पुरते बंदी ठेऊन पुन्हा जोरदार एलईडी फिशिंग सुरु केली आहे. प्रचंड प्रमाणात या नौका सुमारे ४० ते ७० नौटिकल मैल अंतरावर मासेमारी करत आहेत. या एलईडी नौकांबरोबरच फास्टर इंजिनच्या मल्फी आणि गुजरातच्यादेखील नौका मासेमारी करत आहेत. त्यामुळे पारंपारिक मच्छिमारांना कशी मासळी मिळणार, असे येथील मच्छिमारांनी सांगितले.
अशा परिस्थितीमुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली असून येथील मच्छीमार प्रचंड हतबल झाला आहे. कारण पारंपरिक मच्छिमारांना ७ ते ८ दिवस मासेमारीला जाऊनदेखील मासळीच मिळत नाही. एका नौकेवर ८ किंवा ४ दिवसांकरता मासेमारी करण्यासाठी लागणारे साहित्य, नोकरवर्ग यांचा लाखो रुपयांचा खर्च नौकामालकाच्या अंगावरच पडत आहे. परंतु असे एकदा दोनदा नव्हे तर संपूर्ण मौसमात हीच परिस्थिती हर्णै बंदरातील नौका मालकांवर आली आहे. अशा परिस्थितीतसुद्धा बंदरात हजारो नौका आपला उद्योग करत आहेत. यात नौकामालकाचे अक्षरशः कंबरडे मोडत आहे. अशा या कठीण परिस्थितीत पुन्हा या उद्योगात मच्छिमारांना ठामपणे उभे राहणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे हा उद्योग करायचा तरी कसा ? असा यक्षप्रश्न येथील मच्छिमारांपुढे पडला आहे.
नाहक सर्व खर्च सोसण्यापेक्षा मासेमारी उद्योग बंद करून थेट शांत बसलेले परवडेल, असा विचार करून शिमगा सणाच्या अगोदरपासूनच या नौकामालकांनी नौका किनाऱ्यावर काढण्याचे काम जोरदार सुरु केले आहे. या नौका हर्णै बंदर, पाजपंढरी बंदर याठिकाणी शाकारण्याचे काम सुरु आहे. मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी किमान १५० ते २०० नौका दोन महिन्यांच्या विसाव्याला जयगड खाडीचा आधार घेणार आहेत. तर काही आंजर्ले तसेच दिघी खाडीचा आधार घेणार असल्याचे येथील मच्छिमार बांधवानी सांगितले.