रत्नागिरी - मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना रत्नागिरीतल्या जयगडमध्ये घडली आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या तरुणाचे शोधकार्य सुरू आहे. विरांची विलास खापले (18, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
घटनास्थळावरील ग्रामस्थांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या माहितीनुसार, विरांची हा रविवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी जयगड कासारी येथील बंधाऱ्यावर गेला होता. रविवारी समुद्राला अमावस्येची भरती होती. पाण्याचा जोर नेहमीपेक्षा अधिक होता. दरम्यान मासे पकडत असताना विरांची अचानक पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहासोबत विरांची वाहून जाऊ लागला. तेव्हा त्याच्या मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. नजीकच्या गावातील ग्रामस्थ मदतीसाठी दाखल होईपर्यंत विरांची पाण्यात बुडाला.
या घटनेची खबर तात्काळ स्थानिक पोलीस पाटील आणि प्रशासनाला देण्यात आली. वीरांचीचा शोध रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मात्र त्याचा शोध लागला नव्हता.
हेही वाचा - रत्नागिरीतही खगोलप्रेमींनी लुटला खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद
हेही वाचा - लालपरी धावली...! रत्नागिरीतील बससेवा हळूहळू पूर्वपदावर