रत्नागिरी - मासेमारीला १ जूनपासून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, बंदी आदेश झुगारुन मासेमारी करणाऱ्या जयगड येथील दोन नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत ४० हजारांचे मासे जप्त केले आहे. संबधीत नौकांना दोन लाखांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.
सहायक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष देसाई, रश्मी आंबुलकर, पुरुषोत्तम घवाळी यांच्या पथकाने दोन नौकांवरक कारवाई केली.
शौकत अब्दुल उमर डांगे (रा.जयगड) यांच्या नौकेवर ३० हजारचे मासे आढळले. त्यांना दिड लाखचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. फत्तेमहम्मद मुजावर यांच्या जयगडचा राजा या नौकेवर १० हजारचे मासे आढळले. त्यांना ५० हजारचा दंड प्रस्तावित केला आहे.
यावर्षी पाऊस लांबल्यामुळे अजुनही समुद्र खवळलेला नाही. निरभ्र वातावरण असल्याने मच्छीमार निर्धास्तपणे बंदी कालावधी सुरु झाल्यानंतरही मासेमारीला जात आहेत. ७० टक्के पेक्षा जास्त मासेमारांनी नौका किनाऱ्यावर ओढलेल्या आहेत. मात्र, काही मच्छीमारांकडून बंदीचे उल्लंघन केले जात आहे. मत्स्य विभागाने १ जुनपासून बंदी मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवले आहे. गस्ती नौकेसह बंदराच्या ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत पथके कार्यान्वित आहेत.