रत्नागिरी - मतदानाच्या आणि त्याच्या अगोदरच्या दिवशीच्या वृत्तपत्रांतील जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे, असे मत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाणांनी व्यक्त केले.
अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी आणि त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहेत. त्यामुळे अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नाही. त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम ३२४ नुसार प्राप्त झालेले तसेच आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून हे आदेश काढले आहेत.
या निर्णयामुळे कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार एमसीएमसी करून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात २३ एप्रिलला मतदान असून पूर्व प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती कक्ष, जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नवीन प्रशासकीय इमारत, अे विंग, तळमजला,रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.