रत्नागिरी - जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम पहाणारे डॉ. मोहित कुमार गर्ग यांची रत्नागिरीचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
डॉ. प्रवीण मुंढे यांनी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोबाईल ॲप व अन्य नवीन उपक्रम सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. जिल्ह्यातील पोलिसांसाठी देखील त्यांनी अनेक चांगले उपक्रम राबविले होते. डॉ. मुंढे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस दलासाठी राबवलेल्या रिफ्रेशमेंट ट्रेनिंग या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले होते. डॉ. मुंढे हे 2012मध्ये आयपीएस झाले. त्यांचे पहिली पोस्टींग पुण्याच्या वाहतूक शाखेत झाली. त्यानंतर धुळ्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते.
रत्नागिरीत पोलीस जिल्हा अधीक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी अवैध धंद्यांवर केलेली कारवाई सर्वश्रूत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत थेट रस्त्यावर उतरून लढताना त्यांना अनेकांनी पाहिले आहे. त्यामुळे मुंढे यांच्या बदलीचा निर्णय समजल्यानंतर अनेक नागरिकांनी त्यांच्या मोबाईलच्या डीपीवर त्यांचे फोटो देखील ठेवले होते.
नवीन पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग हे गडचिरोली जिल्ह्यात 16 जून 201 पासून अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) म्हणून काम करत होते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीतील नक्षलवादग्रस्त भागांत मतदान जनजागरण मोहिमेत त्यांनी प्रभावी काम केले आहे.
हेही वाचा-करण जोहर एनसीबीच्या रडारवर! पार्टी प्रकरणी होऊ शकते चौकशी