रत्नागिरी - जिल्ह्यात शिवसनेने एकतर्फी वर्चस्व मिळवले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेची कामगिरी चांगली आहे. ग्रामीण भागातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
हेही वाचा - रत्नागिरीत ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरूवात
जिल्ह्यात एकतर्फी शिवसेना पॅनल विजयी
सामंत म्हणाले की, मतमोजणीचे कल बघता जिल्ह्यात एकतर्फी शिवसेना पॅनल विजयी झाले आहेत. याची प्रचिती माझ्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात येत आहे. तसेच, देवगडमध्ये एकही ग्रामपंचायत आमच्याकडे नव्हती, तिथे आम्ही 5 ते 6 ग्रामपंचायतीमध्ये यश मिळवले आहे. तसेच, वैभववाडीमध्येसुद्धा आमच्याकडे एकही ग्रामपंचायत नव्हती, तिथेही आम्ही 3 ग्रामपंचायती जिंकलो आहोत. कणकवलीतही 3 ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या आहेत. मी ज्या जिल्ह्याचा संपर्कमंत्री आहे, त्या कोल्हापूरमध्ये देखील शिवसेना पुढे आहे.
जनतेने उद्धव ठाकरेंवर विश्वास दृढ केला - सामंत
महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावरचा विश्वास दृढ केलेला आहे. आणि ठाकरे हे महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनामध्ये आहेत. हे ग्रामपंचायत निवडणुकीवरून सिद्ध झाले आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
हेही वाचा - चिपळूणच्या खाडीपट्ट्यात अनधिकृतपणे वाळू उत्खनन, कारवाईच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष?