रत्नागिरी - खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना जोर का झटका मिळाला आहे. कारण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार संजय कदम यांची शिक्षा कायम ठेवली आहे. 2005 सालच्या तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा प्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने दिलेला निकाल आज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी ही शिक्षा होती. ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.
सन 2005 मध्ये अतिवृष्टी होऊन हाहाकार माजला होता. खेड मध्ये जगबुडी नदीचे पाणी घुसून करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. यावेळी संजय कदम शिवसेनेचे स्थानिक नेते होते. व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी याकरिता सेनेचा जमाव तहसील कार्यालयावर गेला यावेळी प्रांताधिकारी गेडाम उपस्थित होते. शिवसैनिक आणि गेडाम यांच्यात बाचाबाची सुरु असतानाच संजय कदम यांनी त्यांना धककबुक्की करत खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात गेडाम यांनी तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयात खटला सुरु होता.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन फेब्रुवारी 2015 मध्ये खेड दिवाणी न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना 1 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर संजय कदम यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत आज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना खेड दिवाणी न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे संजय कदम यांच्यासाठी हा जोर का धक्का मानला जात आहे.