रत्नागिरी - ऑक्टोबर महिन्यात आलेल्या वादळी पावसामुळे भात शेती व तत्सम पिके यांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून 2 नोव्हेंबर पूर्वी विहित नमुन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.
तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक यांनी संयुक्त पाहणी करावी, नुकसान झालेल्या भात शेती व इतर शेतीचे सातबारा तलाठ्यांनी तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. यानुसार नुकसान झालेल्या भागात संयुक्त पाहणी करून झालेल्या नुकसानीची माहिती विहित नमुन्यात कोणत्याही परिस्थितीत 2 नोव्हेंबरपूर्वी सादर करण्याचे निर्देश या लेखी आदेशात देण्यात आले आहेत. या आदेशानुसार आज तत्काळ भात शेती व इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे काम जिल्ह्यात सर्व ठिकाणी सुरू झाले आहे.