रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल आणि इतर सुरक्षा दलातील जवानांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम केले आहे. त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवत दिपक नोनी कोम टेक्नॉलॉजीज् लिमीटेड कंपनीतर्फे प्रोटेक्टर कीट देण्यात आले. पोलीस दलातील दंगल विरोधी पथक आणि शीघ्र कृती दलाच्या पथकास हे बॉडी प्रोटेक्टर कीट दिले गेले. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पाडला.
दंगल सदृश्य परिस्थितीमध्ये पोलिसांना या किटचा उपयोग होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी हजर होते. यावेळी दोन्ही दलातील जवानांनी कीट परिधान करून प्रात्यक्षिक देखील सादर केले. दंगलीच्या वेळी प्रक्षुब्ध जमावास नियंत्रणात आणण्यासाठी, पोलिसांच्या स्वरक्षणासाठी ढाल व अन्य साहित्य असते. त्यामध्ये आता अधिक सुरक्षा मिळण्यासाठी या बॉडी प्रोटेक्टर किटचा उपयोग होणार आहे.
या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, रामदास पालशेतकर, शिरीष सासणे, हेमंतकुमार शहा, राखीव पोलीस उपनिरीक्षक संतोष गिरी, दिपक नोनी कोम टेक्नॉलॉजीचे बोंडीराम सावंत, सुशील गायकवाड, ओंकार देवल आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.