रत्नागिरी - गणेशोत्सवासाठी सध्या लाखो चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरली आहे. मात्र, कोकणात येणाऱ्या या चाकरमान्यांना तपासणी केंद्रावर अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं समोर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील एका आरोग्य तपासणी केंद्रावर लाईट नसल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे या प्रवाशांनी आपली नाराजीही व्यक्त केली आहे.
गणेशोत्सव आणि कोकण यांचं एक वेगळं नातं आहे. मात्र, यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही विशेष खबरदारी घेतली जात आहे. ठिकठिकाणी तपासणी केंद्र उभारणी आली आहेत. दरम्यान, लांजा येथील देवधे येथे चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणी केंद्रातील बत्ती गुल झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेले ३ दिवस वैद्यकीय तपासणी केंद्रात लाईट नाही. त्यामुळे मेणबत्तीच्या प्रकाशात आरोग्य कर्मचारी आणि पोलीस काम करत आहेत. तर आरोग्य केंद्राच्या बाहेरसुद्धा लाईट नाहीत. अशा परिस्थितीत येणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे..