रत्नागिरी - जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. शनिवारी दापोलीत डम्पिंग ग्राउंडजवळ सहा कावळे मृतावस्थेत आढळून होते. हे सर्व मृत कावळे तपासाकरीता भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल आला असून या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाला असल्याचे या अहवालात म्हणण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बर्ड फ्ल्यूचा जिल्ह्यात शिरकाव -
देशात काही ठिकाणी बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला असतानाच महाराष्ट्रातही आता बर्ड फ्ल्यूने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गेले काही कावळे किंवा पक्षी मरण्याच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. त्यातच मुंबई, ठाणे, परभणी, बीडमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातही बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे. दापोली तालुक्यातील मृत कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दापोलीत सापडले होते मृत कावळे -
दापोली नगरपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात काही दिवसांपूर्वी अचानकपणे पाच कावळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांना मृतावस्थेत आढळून आले. तसेच नगरपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळ आणखी एक कावळा मृतावस्थेत आढळला होता. याची माहिती नगरपंचायतीचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कावळे मृत पावलेल्या ठिकाणी धाव घेऊन या कावळ्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. या मृत कावळ्यांचे नमुने घेऊन हे सर्व मृत कावळे पुढील तपासाकरीता पुणे येथून भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात होते.
जिल्ह्यात 9 विशेष पथक -
कोंबड्या किंवा पक्षांवर मरतुकीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात नऊ विशेष पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. या पथकाद्वारे उपचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक पथक नेमण्यात आले असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.