रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळ हे रायगडच्या अलिबागजवळ मुरूड किनाऱ्यावर धडकले आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी लगत जोरदार वारे वाहू लागले आहे. यासोबत पाऊसही सुरू आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही हानी झालेली नाही.
निसर्ग चक्रीवादळामुळे आज सकाळपासून सुरू झालेल्या वाऱ्यामुळे किनारपट्टी भागात भीतीचे वातावरण आहे. यामुळे किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने केले स्थलांतर करण्यात आले आहे. आतापर्यंत गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्यातील जवळपास 4 हजार लोकांना स्थलांतर करण्यात आल्याचे समजते.
चक्रीवादळ अलिबागमध्ये धडकल्यानंतर रत्नागिरी किनारपट्टीवर, वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. पूर्णगड, पावस, हेदवी, रत्नागिरी मालगुंड, जकादेवी, आदी भाग चक्रीवादळाच्या 'ब्लू झोन'मध्ये आहेत. सद्य स्थितीत या परिसरात वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी पेक्षा जास्त आहे. सर्वाधिक वेग जयगड किनाऱ्यावर असून येथे ताशी 110 किमी पेक्षा जास्त वेगाने वारे वाहू लागले आहेत.
दरम्यान, जसजसे चक्रीवादळ पुढे सरकेल तसे दापोली आणि मंडणगडच्या किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग ताशी 120 किमी पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, बाहेर पडू नये आणि संकटकाळी आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत आढळले कोरोनाचे १० नवे रुग्ण, जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीनशे पार
हेही वाचा - रत्नागिरीला निसर्ग वादळाचा फटका; झाडे कोसळली, घरांचे नुकसान