खेड (रत्नागिरी) - कोरोनाचे संकट गडद होत आहे. पण या कोरोनाचा सामना करण्यासाठी सध्या खेड नगरपरिषद सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील 'क' वर्ग दर्जा असलेल्या या नगरपालिकेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. 'क' वर्ग दर्जा असून देखील या खेड नगरपरिषदेने कोविड सेंटर सुरु केले आहे. राज्यातील एकमेव 'क' वर्ग दर्जाच्या नगरपरिषदेने हे धाडस स्विकारले आहे. २० बेडचे हे कोविड सेंटर हिराभाई बुटाला विचार मंच आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये हाय फ्लो नोजल आँक्सिजन, डय़ुरा सिलेंडरची मशिनरी अशी आधुनिक मशिन या कोविड सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले.
एचडीएफसी बँक-सीएसआरच्या माध्यमातून, कळंबणी-खेड, दापोली आणि चिपळूण येथील सब डिस्ट्रिक्ट इस्पितळांत या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डय़ुरा सिलिंडर ऑक्सीजन प्रणाली (सिस्टिम) मध्ये क्रायोजेनीक तंत्रज्ञानाचा उपयोग करून लिकविड मेडिकल ऑक्सीजनचा साठा करण्यात येतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग मुख्यत्वे नासा, डीआरडीओ आणि इस्रो द्वारे करण्यात येतो. वेपोरायजर सिस्टिम जी ३० अंश सेल्सियस तापमानावर साठा केलेल्या द्रवरूप ऑक्सीजनला वायुत रूपांतरित करण्यासाठी आवश्यक असते, यासाठी लागणारी उपकरणे व यंत्रणा, डीआरडीओ आणि इस्रोला उपकरणे पुरविणाऱ्या वाई येथील शेल आणि टय़ूब कंपनीने पुरविली आहेत.
ही डय़ुरा सिलिंडर्स २४ बार प्रेशरला साधारण २०० ते २५० लीटर लिकविड ऑक्सीजनचा साठा करू शकतात. बंधन बँकेच्या सीएसआर फंड आणि स्टेट ऑफ आर्ट या संस्थेच्या माध्यमातून खेड नगर परिषदेला अत्याधुनिक अशी कार्डियाक अॅम्ब्युलेन्स देणगी स्वरुपात दिली आहे. बंधन बँकेचे पुणे येथील ब्रांच हेड आदित्य मराठे हे या प्रोजेक्टमध्ये स्वतः जातीने लक्ष ठेऊन होते. कार्डियाक अॅम्ब्युलेन्स बॉडी ही अँटी बॅक्टेरियल मटेरियल वापरुन तयार करण्यात आली असून यात अत्याधुनिक ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर बसविण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजच्या घडीला पुणे आणि नागपूर सारख्या महानगर पालिकांकडे देखील अशा प्रकारची स्वतःची अशी कार्डियाक रुग्णवाहिका नाही. ही कार्डियाक अॅम्ब्युलेन्स ही ससून (पुणे) येथील विशेषज्ञांच्या मार्गदर्शक सुचनांनुरूप बांधण्यात आली आहे.
रुग्णांना ऑक्सीजन बेडसाठी पुण्या-मुंबईकडे धाव घ्यावी लागणार नाही- कौस्तुभ बुटाला
कोकण विभागातील आरोग्य विषयक पायाभूत सोयी सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि ऑक्सिजन कपॅसिटी वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसआर फंडातून एक पायलट प्रोजेक्ट उभा करण्यात आला आहे. पहिल्यांदाच भारतात तीन सब डिस्ट्रिक्ट रुग्णालयांमध्ये डय़ुरा सिलिंडरवर आधारित हाय कपॅसिटी ऑक्सिजन सिस्टिम बसविण्यात आल्या आहेत. हाय फ्लो नोजल ऑक्सीजन (HFNO) आणि BI पप मशीन सारखी आधुनिक वैद्यकीय उपकरणे देणगी स्वरुपात मिळाली आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेडच्या सुविधांअभावी आता पुण्या-मुंबईकडे धाव घ्यावी लागणार नाही. एक डय़ुरा सिलेंडरची क्षमता ही २१ ते ३० जम्बो सिलेंडर्स इतकी असते, अशी माहिती या प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडणारे कौस्तुभ बुटाला यांनी दिली.