रत्नागिरी- कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यात शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही लस दिली जात आहे. १६ जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत ४ हजार ६२६ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना संख्या नियंत्रणात
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. गेल्या आठ दिवसात कमी - अधिक प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. बाधितांबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासण्याही मोठ्याप्रमाणात केल्या जात आहेत. कोरोनाच्या धसक्यातून नागरिक सावरत आहेत. हळू हळू जीवनमान पुर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.
लस घेणाऱ्यांची संख्येत वाढ
१६ जानेवारीला जिल्ह्यातील पाच केंद्रांवर लसीकरण सुरु झाले. पहिल्या तीन दिवसात लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला. परंतू हळूहळू या लसीकरण मोहीमेला चांंगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योध्दांचा सामावेश करण्यात आला आहे. २४ जानेवारीनंतर लसीकरण केंद्र वाढविण्यात आली. प्रत्येक तालुक्यात ही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आरोग्य विभागातील शासकीय यंत्रणांबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्स यांनाही लस दिली जात आहे. पुढील टप्प्यात पोलिसांचा समावेश केला आहे.
२० दिवसांत ४ हजार ६२६ जणांना लस
दरम्यान आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात ६७८, दापोली ग्रामीण ५५०, कामथे ५७७, वालावलकर १७१, कळंबणी ४०२, मंडणगड २४३, लांजा ३४४, संगमेश्वर ग्रामीण ३७८, गुहागर ग्रामीण ५९६, राजापूर ग्रामीण रुग्णालयात ५९७ आशा एकूण ४ हजार ६२६ जणांना लस देण्यात आली आहे.
लसीकरणाला ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद
लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकराचा दुषपरिणाम दिसून आला नाही. जिल्ह्यासाठी आत्तापर्यंत १६ हजार लस आल्या आहेत. एका लाभार्थ्याला दोन लस दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आठ हजार व्यक्तींनाच लस दिली जाऊ शकते. त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातूनही या लसीकरण मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही मोहीम यशस्वी ठरणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.