रत्नागिरी - जिल्ह्यात 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. रविवारीपासून म्हणजेच 02 मे 2021 पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
लस उपलब्ध, लसीकरण केंद्र निश्चित
लसीकरणासाठी लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आली असून मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथे कोव्हीशिल्ड लसीचे 1500 डोस, ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे कोव्हीशिल्ड लसीचे 1500 डोस, ग्रामीण रुग्णालय गुहागर अंतर्गत जीवन शिक्षण शाळा क्र.1 येथे कोव्हीशिल्ड लसीचे 1500 डोस, नगरपरिषद दवाखाना चिपळूण येथे कोव्हीशिल्ड लसीचे 1500 डोस, नगरपरिषद दवाखाना खेड येथे कोव्हीशिल्ड लसीचे 1500 डोस वाटप करण्यात आलेले आहे.
दिलेल्या लसीचा वापर पुढील सात दिवसांकरिता करावयाचा आहे. पहिले सहा दिवस प्रत्येक सत्राचे उद्दिष्ट 200 लाभार्थ्यांसाठी असून सातव्या दिवशी 300 लाभार्थ्यांना लसीकरण करावयाचे नियोजन करण्यात आले आहे. सदर लसीकरण मोहीम 02 मे 2021 पासून सुरु करण्यात येणार आहे.
ही लसीकरण पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठीच असेल. सत्राच्या ठिकाणी ऑनस्पॉट रजिस्ट्रेशन करुन कोणत्याही लाभार्थीस लसीकरण करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.