रत्नागिरी - जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण लंडनवरून जिल्ह्यात आलेल्या 9 जणांपैकी 5 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 3 जणांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. तर एक जण गोव्याला गेला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
इंग्लंडमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू प्रकार आढळून आला. या विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लंड येथून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
8 पैकी 5 जणांचा अहवाल निगेटिव्ह
जिल्ह्यात लंडन येथून नऊ प्रवासी दाखल झाले. यातील सहाजण रत्नागिरीत उतरले तर 2 जण संगमेश्वर येथे आले. तर एकजण गोवा इथे गेला आहे. दरम्यान, या आठही जणांना शोधण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. या आठही जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब चाचणी) घेण्यात आले होते. यातील 5 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, पाचही जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर उर्वरित तिघांचा अहवाल येणे बाकी आहे. पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांसह रत्नागिरीकरांचा जीव भांड्यात पडला आहे.
त्यांना गृह अलगीकरणात ठेवणार
दरम्यान, ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यांना 28 दिवसांकरीता गृह अलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कामलापूरकर यांनी दिली आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.