रत्नागिरी -जिल्ह्याची हद्द असलेल्या खेड तालुक्यातील कशेडी घाटात महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांपैकी आजारी संशयित व्यक्तीची आरोग्य विभाग व प्रशासनाने कोरोना अँटिजेन/आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरच कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
रत्नागिरीच्या प्रवेशद्वारावर चाचणी
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यभर 'ब्रेक द चेन' मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू नसले तरी कोरोना पसरू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आता जिल्हा प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलत तपासणी व कोरोना चाचणी वाढवण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी नसली तरी जे लोक मुंबई-गोवा महामार्गावरून जिल्ह्यात येतील त्यांच्याकडे अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मास्क, सॅनिटायझर चा वापर न करणाऱ्याना दंड
जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्ती आजारी असतील किंवा संशयित वाटतील त्याची कशेडी घाटात अँटीजन तपासणी शुक्रवारी दि १६ रोजी पासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरून जिल्ह्यात येणाऱ्यांनी अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये व प्रवास करायचा असल्यास कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. तसेच मास्क, सॅनिटायझरचा वापर न करणाऱ्याना दंड करण्यात येत आहे.