रत्नागिरी - जिल्ह्यात आज(मंगळवार) आणखी दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 300 चा आकडा पार केला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 307 वर जाऊन पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सोमवारी रात्री 10 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज (मंगळवार) संध्याकाळी आणखी 10 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. यामध्ये कामथेतील 4, संगमेश्वर 2, रत्नागिरीत 1, दापोली 2 आणि राजापूरातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 307 च्या घरात पोहोचली आहे. दरम्यान आजपर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 120 झाली आहे. या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 10 जणांचा बळी गेला आहे. तर, सध्या 168 जण उपचाराखाली असून दिवसेंदवस वाढणारी कोरोना रुग्णांच्या संख्या ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.