रत्नागिरी - राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने पेट्रोल-डिझेलच्या वितरणावर कडक निर्बंध आणले आहेत. ठराविक वेळेतच दुचाकी वगळता तीनचाकी, चारचाकी किंवा इतर अवजड वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही.
शासकीय गाड्यांना व रुग्णवाहिकांना इंधन देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आजपासून 9 प्रकारच्या सेवा वगळून रस्त्यावर फक्त दुचाकी धावणार आहेत. तीनचाकी व चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दुचाकींना फक्त सकाळी 10 ते दुपारी 1 व संध्याकाळी 4 ते 6 या वेळेतच पेट्रोल मिळणार आहे.
पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. त्यामुळे आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.