रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस सकाळपासून चांगलाच बरसत आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत महारेनच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 687 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सरासरी 76.33 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला जिल्ह्यात पाऊस चांगला बरसला, त्यानंतर मात्र काही दिवस पावसाने पुन्हा पाठ फिरवली. पण सध्या गेले काही दिवस जिल्ह्यात पाऊस चांगलाच बरसत आहे. आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात झाला असून, दापोलीत तब्बल 118 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल खेडमध्ये 93, रत्नागिरीत 91 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर चिपळूण आणि लांजा तालुक्यात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मंडणगडमध्ये 76 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. यावर्षी जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 1607 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पाऊस सुरू झाल्यापासून आजपर्यंत सर्वाधिक पाऊस राजापूर आणि दापोली तालुक्यात झाला आहे. राजापूरमध्ये 1854 मिमी, तर दापोलीत 1800 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागरमध्ये 1704 मिमी आणि लांजा तालुक्यात 1698 मिमी पावसाची नोंद झाली आहे.