रत्नागिरी- सलग दोन दिवस गणपतीपुळेच्या समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी या घटना घडल्या. सुदैवाने जीवरक्षकांच्या तत्परतेमुळे समुद्रात बुडणाऱ्यांचे प्राण वाचले. त्यामुळे या घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
पुण्यातल्या दौंड तालुक्यातील पिंपळेगाव येथे राहणारे कापरे कुटुंबीय, शनिवारी गणपतीपुळेत आले होते. देवदर्शन झाल्यानंतर ते समुद्रात उतरले. काही वेळानंतर पूजा कापरे, नंदकुमार कापरे आणि प्रदिप कापरे समुद्रात बुडू लागले. मात्र, जीवरक्षकांच्या तत्परतेमुळे त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले.
त्यानंतर रविवारी देखील अशीच घटना घडली. बेळगाव येथील तिघेजण पाण्यात बुडत होते. त्यांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. गणेश संकपाळे, मल्लीका संकपाळे, वाद्यंमोडा नाईक अशी वाचविण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही पोहण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नास्लयाने ते बुडू लागले. मात्र जीवरक्षक रोहीत चव्हाण आणि तेथील व्यावसायिक विरेंद्र सुर्वे, प्रसाद पेडणेकर, निखिल सुर्वे, सिद्धेश सुर्वे यांनी आपला जीव धोक्यात घालून या तिघांना वाचवले.
गेल्या दोन दिवसात घडलेल्या या घटनांवरून पर्यटकांचा अतिउत्साहीपणा त्यांच्या जीवावर बेतण्याला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निदान समुद्रात पोहण्याचा आनंद घेताना पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.