रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे (गोवा राज्य सीमा) येथील एका बोगद्यात भिंत कोसळून दरड रेल्वे रुळावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असणाऱ्या कोकण रेल्वेच्या या बोगद्यातील काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, कोकण रेल्वेचा मार्ग सुरळीत होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांंच्या प्रवासाचा मार्ग बदलण्यात आला आहे. पनवेल-पुणे-मिरज-लोंढा-मडगाव आणि मडगाव-लोंढा-मिरज-पुणे-पनवेलमार्गे गाड्या वळविण्यात आल्या आहेत. या गाड्या 20 ऑगस्टपर्यंत याच मार्गे धावणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोरोनामुळे कोकण रेल्वेवर काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मुंबई, दिल्ली, एर्नाकुलम, तिरुअनंतपुरम येथून काही एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र, या गाड्या पनवेल, पुणे, मिरजमार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा वेळ लागणार आहे. दरम्यान, वळविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन -एर्नाकुलम सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस, तिरुअनंतपुरम मध्य-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) विशेष एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) - तिरुअनंतपुरम, तिरुअनंतपुरम मध्य-नवी दिल्ली राजधानी स्पेशल एक्स्प्रेस या गाड्या 20 ऑगस्टपर्यंत नवीन मार्गे धावतील.
नवी दिल्ली-तिरुअनंतपुरम मध्य राजधानी स्पेशल एक्सप्रेस 18 ऑगस्टपर्यंत, हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम दुरंतो स्पेशल एक्स्प्रेस, एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन दुरंतो स्पेशल एक्स्प्रे्स 15 ऑगस्टपर्यंत याच मार्गे धावणार आहे.