रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या रत्नागिरीतील मंडणगड आणि दापोली तालुक्यांमधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज (दि. 17 जून) रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहे. आज सकाळी हे पथक मंडणगडमध्ये दाखल झाले. रमेश कुमार गणता यांच्या नेतृत्वात हे पथक जिल्ह्यात पाहणी करणार आहे.
आज मंडणगड येथे दाखल झाल्यावर मंडणगड येथील विश्रामगृहात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पॉवर पॉइंटद्वारे सादरीकरण करून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती या पथकाला दिली. मोठ्या प्रमाणावर घरांचे झालेले नुकसान सोबतच फळबागांचे नुकसान आणि वीज पुरवठा याबाबत विविध विषयांवर यावेळी पथकाने माहिती घेतली.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर सुरळीत व्हावे यासाठी सरकार वेगात काम करत आहे. वाढीव मदत मिळण्यासाठी बदललेल्या निकषानुसार आत्तापर्यंत 2 हजार 900 पेक्षा अधिक बाधितांना साडे सात कोटींची रक्कम भरपाई म्हणून देण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत एका पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.
हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी