रत्नागिरी - गुहागरमधील शृंगारतळी येथे घेण्यात आलेली सामूहिक नांगरणी स्पर्धा आयोजकांसह स्पर्धकांच्या चांगलीच अंगलट आली आहे. मुक्या प्राण्यांना निर्दयतेने वागवल्याबद्दल गुहागर पोलिसांनी आयोजकांसह, जमीन मालक आणि स्पर्धक अशा एकूण 36 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांचाही समावेश आहे. प्राण्यांना निर्दयपणे वागवल्याचा कायदा अधिनियम 1960 कलम 11(1)(अ) (2) आयपीसी 18834 कलमा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी मंत्री आणि गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (गुहागर तालुका) वतीने 16 ऑगस्टला 'भव्य सामूहिक नांगरणी स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले होते. मागच्या आठवड्यात संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथे देखील अशाच प्रकारची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत एक बैल जोडी बिथरल्यामुळे 5 ते 6 जण बालंबाल बचावले होते. याप्रकरणी आयोजक, स्पर्धक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र ही घटना ताजी असतानाही गुहागरमध्ये अशीच स्पर्धा भरवण्यात आली. त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक मुळे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, इम्रान घारे, प्रवीण ओक, सुनील पवार, पांडुरंग कापले, डॉ. प्रकाश शिर्के, लतिफ लालू, सुनील जाधव यांच्यासह जमीन मालक सिराज अब्दुल्ला घारे, अब्बास इसाक कारभारी याच्यासह 25 स्पर्धक असा एकूण 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.