रत्नागिरी - उत्तर प्रदेशातील घटनेचा निषेध आणि कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यासाठी शुक्रवारी (दि. 2 ऑक्टोबर) रत्नागिरीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसच्या टायर पेटवून या घटनेचा निषेध नोंदवला होता. तसेच पोलिसांशी झटापटही झाली होती. त्यामुळे जमावबंदी आदेशाचा भंग आणि ज्वालाग्राही पदार्थाचा वापर करून सोबत आणलेले टायर रस्त्यावर जाळल्याप्रकरणी 30हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी धोरणाविरोधात काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी रत्नागिरीत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्त्यावर टायर पेटवून रस्ता अडवण्यात आला. यावेळी केंद्रातील भाजपा सरकारच्या कारभारावर जोरदार टीका तसेच घोषणाबाजी करण्यात आली. सुरुवातीला पोलीस व कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्यात थोडी झटापट देखील झाली. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा संभव असल्याचे माहीत असतानाही सामाजिक अंतर न ठेवता आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी व कायकर्ते यांच्याविरुद्ध भा.दं.वि.चे कलम 143, 147, 149, 341, 285, 188, 269, 270 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे निरीक्षक मनोज शिंदे, जिल्हाध्यक्ष अॅड .विजय भोसले, माजी आमदार हुस्नाबानू खलिफे अन्य 30 ते 35 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - राहुल गांधींना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, चिपळूणमध्ये काँग्रेसचा आक्रमक पवित्रा