रत्नागिरी - गणपती उत्सवासाठी मुंबईहुन गावी येणाऱ्या प्रवाशांची चारचाकी गाडी जळून खाक झाल्याची घटना आज(1 सप्टेंबर) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राजापूर तालुक्यातील नाटे येथे सागरी महामार्गावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मौल्यवान सामानासह स्विफ्ट डिझायर गाडी जळून खाक झाली आहे.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहिती नुसार, चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे गाडीतील सर्व लोक तत्काळ बाहेर पडले. माहिती मिळताच नाटे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लगेच पेलिसांना फोन वरून घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस कर्मचारी विक्रांत कदम, संभाजी कदम, सुयोग वाडकर, ममता नामये आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
गाडीने भर रस्त्यात पेट घेतल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आग विझल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गाडी बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
जब्बार काझी, पिण्ट्या राजापकर, मनोज आडविरकर, संतोष चव्हाण, नुरू हूसये, हसन हूस्स्ये, अलकेश पवार, लुकमान तमके, तैजीब बांगी आदींसह साखरी नाटे येथील अनेक युवकांनी गाडी विझविण्यासाठी प्रयत्न केले.