रत्नागिरी - राज्यातील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जागे करुन कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भाजपने आजपासून राज्यभर 'महाराष्ट्र बचाओ' आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी आज राज्यभर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातही भाजपकडून निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, की सर्व देशाबरोबर महाराष्ट्र सुद्धा कोरोनाच्या विरोधामध्ये संघर्ष करत आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्यूदर यांच्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र क्रमांक 1 वर पोहोचलेला आहे.
राज्य सरकारचा नाकर्तेपणा, सरकारच्या नेतृत्वाचे या सर्व गोष्टींकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्षामुळे आज महाराष्ट्राची अशाप्रकारची दयनीय अवस्था झालेली आहे. राज्यामध्ये प्रशासन नावाचे काही अस्तित्वात आहे का, अशा प्रकारची भावना आता लोकांमध्ये उरलेली नाही. किंबहुना राज्य करणारे जे सत्ताधारी आहेत यांचे अस्तित्वच याठिकाणी जाणवत नसल्याने अशा प्रचंड मोठ्या संकटाच्या वेळेला राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाल्याचा आरोपही भाजपच्या वतीने करण्यात आला.
राज्यांच्या मंत्र्यांमध्ये व प्रशासनामध्ये कोणताही समन्वय नाही असे चित्र वारंवार समोर येत आहे. रत्नागिरीमध्ये कोरोना पेशंट संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही स्वॅब टेस्टिंग लॅबबाबत निर्णय होत नाही. आरोग्य सुविधांची उभारणी पर्याप्त न करता मोठ्या संख्येने अन्य शहरातून नागरिकांना मनमानी पास देऊन रत्नागिरीत प्रवेश देण्यात आला. मात्र आरोग्य सुविधांची वानवा व प्रशासनाचे निर्णयात नसलेल्या एकवाक्यतेमुळे गोंधळाचे वातावरण असल्याचा आरोपही करण्यात आला. प्रशासनाची हतबलता मध्यंतरी व्यक्त झाली. त्यामुळे ही प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बाजारपेठा सुरु झाल्या पण बाजारपेठांना रोज सॅनिटायझेशनची आवश्यकता असतानाही ते करण्याबाबत प्रशासन निर्देश देत नाही. या सर्व गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नागरिक तीव्र निषेध करत असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.