अमरावती - गावात सुरू असणाऱ्या अवैध धांद्यांसंदर्भात पोलिसांना खबर दिल्यानं एका युवकाचा अवैध धंदे चालविणाऱ्या टोळक्यानं गेम केला. 31 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता अंजनगाव सुर्जी तालुक्यात पथ्रोट पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शिंदी बुद्रुक या गावात सचिन भीमसागर या तरुणाचा खून झाल्यानं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गावात खळबळ उडाली.
अशी आहे घटना - पथ्रोट पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शिंदी बुद्रुक येथे अवैध धंदे चालविणाऱ्या अभिजीत बबन म्हात्रे यांच्याकडे धाड टाकली. आपल्याकडे चालणाऱ्या अवैध धंद्यांबाबत पोलिसांना सनी भीमसागर यानं खबर दिल्याचा संशय अभिजीत म्हात्रे याला होता. 31 डिसेंबरच्या रात्री अभिजीतनं शंकर दुर्वे ,शफिक शेख, रफिक सौदागर, शेख आतिक, शंभू उर्फ गोलू धुर्वे आणि शंकर धुर्वे यांनी पोही रोड परिसरात राहणाऱ्या सनी भीमसागर याच्यावर तलवारीनं हल्ला चढवला. अभिजीत म्हात्रे यानं सनीच्या छातीत तलवार खुपसली. यानंतर सर्वांनी मिळून सनीला रस्त्यावर फरफटत आणून फेकून दिलं. या घटनेची माहिती मिळताच सनीचा लहान भाऊ भीमराज भीमसागर यानं मित्रांच्या मदतीनं जखमी सनीला पथ्रोट आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचाराकरता नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सर्व आरोपी पसार - 31 डिसेंबरच्या रात्री सनी भीमसागर या युवकाचा खून झाल्यामुळे शिंदी बुद्रुक गावात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याकरता तीन पथक गठीत केले. आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पथ्रोट येथील पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांनी दिली.
हेही वाचा..