रत्नागिरी - शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाजपाच्या वतीने जिल्ह्यात प्रत्येकी 25 बेडची सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासोबत भाजापा नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. त्या बैठकीत तो निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे, जिल्हासरचिटणीस राजेश सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांची या बैठकीला उपस्थिती होती.
भाजपा कोविड सेंटर उभारणार
आमदार प्रसाद लाड हे 50 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर जिल्ह्याला सुपूर्द करणार असून त्या माध्यमातून ऑक्सिजन बँकेची उपयुक्त संकल्पना राबवण्यात येणार आहे. 2 ॲम्बुलन्सही उपलब्ध करून देण्याचे आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी जिंदाल कंपनीच्या माध्यमातून भाजपा एक अतिरिक्त ऑक्सिजन टॅंक सप्लाय करणार असून त्यासही तांत्रिक मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. त्याला जिल्हाधिकारी महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आमदार प्रसाद लाड आणखी एका हॉस्पिटलला त्यांच्या सी.एस.आर. मधून 20 व्हेंटिलेटर बेड तसेच ऑक्सिजनसह 1 ऑक्सिजन युनिट देत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही या विषयास तत्काळ मंजुरी देण्याचे बैठकीत स्पष्ट केले.
कोणतेही राजकारण न करता संपूर्ण सहकार्य
कोविड परिस्थितीमध्ये कोणतेही राजकारण न करता भाजपा संपूर्ण सहकार्य करेल, असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी महोदयांनी आश्वासित केले. ग्राम दक्षता समित्या अधिक सक्रिय करा, त्यांच्यासाठी काही आर्थिक तरतुद करा, तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील पावसाचे पाणी साचत आहे, ती समस्या सोडवा अशा सूचना आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या हॉस्पिटलच्या संपर्कातून तज्ञ डॉक्टर व काही प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट केले.
'ऑक्सिजन बँक' ही नवीन संकल्पना येथे उत्तम पद्धतीने राबवण्यात येईल. तसेच तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगत आपण मांडलेल्या सर्व प्रस्तावांना आपण तात्काळ मंजूरी देऊ, असे स्पष्ट आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले.