रत्नागिरी - विकासामुख समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकारणार्या, काम करणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना विवेकाने बोलावे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात किती उद्योग आले? आणि किती तरुणांना रोजगार मिळाला? याबाबत लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करावे. आपली अकार्यक्षमता दडवून लोकप्रियतेसाठी मुख्यमंत्र्यावर उथळ टीका करू नका, असे प्रत्युत्तर रिफायनरी विरोधकांना भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिले.
हे वाचलं का? - सिंधुदुर्गमधील बड्या राजकीय नेत्याची रिफायनरी प्रकल्प परिसरात 300 एकर जमीन, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट
रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. याच मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राजापूरमध्ये रविवारी झालेल्या निषेध सभेमध्ये खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्र्यांच्या रिफायनरी वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच दलालांच्या घोषणाबाजीला फसून हा प्रकल्प येथील जनतेच्या माथी मारत असेल, तर तो प्रयत्न उधळवून लावू, असा इशारा दिला होता. त्यालाच प्रत्युत्तर देताना अॅड. पटवर्धन बोलत होते.
हे वाचलं का? - रिफायनरी उभारण्याचे कटकारस्थान कराल तर ते उधळून लावू - विनायक राऊत
महाजनादेश यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यावर त्यांनी नाणार रिफायनरीबाबत सकारात्मकता दाखविली होती. त्यानंतर विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टिकेची झोड उठविण्यात आली आहे. फडणवीस हे दलालांच्या दबावाखाली आले अशीही टीका होत आहे. याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले की, मुख्यमंत्रीपदी काम करताना महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून कार्यक्षमपणे कार्यरत असलेल्या फडणवीस यांच्यावर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी टीका करताना लोकप्रतिनिधीनींनी संयम ठेवणे अपेक्षित आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी व्हायचे त्यांच्यावरच अर्वाच्च भाषेत टीका करायची आणि आव्हान द्यायचे हे जनतेला पटणारे नाही.
हे वाचलं का? - नाणार प्रकल्प रद्दच असल्याचा दिपक केसरकर यांचा निर्वाळा
मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच प्रकल्पाबाबतचे गैरसमज दूर करून प्रकल्प होऊ देण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. 17 सप्टेंबरला प्रकल्प समर्थक मुख्यमत्र्यांना सामोरे आल्यानंतर येथील जनतेला प्रकल्प हवा असेल तर फेरविचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित करणे हे समयोचित होते.
गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती उद्योग कार्यरत झाले? येथील युवकांच्या भविष्यासाठी काय केले? याबाबत लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करावे. लोकांच्या भावना भडकवून त्यावर स्वार होऊन राजकीय हित साधण्याचा संकुचित स्वभाव बदलून या जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणासाठी प्रयत्न करणे, हजारो एकर पडीक कातळ जमिनी विकसित करण्यासाठी शासनाकडे नव्या योजना मांडून पाठपुरावा करण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करावे, असे पटवर्धन यावेळी म्हणाले.