रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांकरिता आलेला ऑक्सिजन टँकर रायगड गॅसेस कंपनीने, ऑक्सिजन न उतरवताच जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून घेतला. हे केवळ मंत्री आणि मुख्य सचिवांचे वजन वापरून अधिक नफा मिळवण्यासाठी करण्यात आले. यावरून राज्य सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला जनतेच्या जीवाशी सोयरसुतक नसल्याचे उघड झाले आहे. म्हणून सरकार कंपन्यांच्या नफ्यासाठी हितसंबंध जोपासत आहे, असा आरोप भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर लागत आहे. मात्र, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यातील गोंधळ चव्हाट्यावर आला असतानाच निलेश राणे यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सुनील गुप्ता यांंच्या रायगड गॅसेस या कंपनीचा ऑक्सिजन जिल्हाधिकारी यांनी रत्नागिरीसाठी मागविला होता. मात्र, रायगड गॅसेसकडून मागविलेली ऑक्सिजनची गाडी ऑक्सिजन न उतरवताच निघून गेली. वैद्यकीय उपचारासाठी असणाऱ्या ऑक्सिजनसाठी कमी किंमत मिळते तर, तोच ऑक्सिजन इंडस्ट्रीत म्हणजेच उद्योगासाठी दिला गेला तर, त्याच ऑक्सिजनची किंमत वाढते. त्यामुळे या सुनील गुप्ताने मुख्य सचिव आणि मंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून ती ऑक्सिजनची गाडी रत्नागिरीतून सोडवून घेतली. हाच सुनील गुप्ता लोटे येथील एमआयडीसीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करतो.
हेही वाचा - लवकरच होणार 'कोविशिल्ड'ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी; ससून रुग्णालयात नावनोंदणी सुरू
अधिकचा नफा मिळवण्यासाठी दबावाचा वापर करून जिल्ह्यातील जनतेला राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप राणे यांनी केला. या प्रकारामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवणार आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे राणे म्हणाले. उद्या रुग्णांना ऑक्सिजन मिळेल की नाही, याची शाश्वती जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री देऊ शकत नाहीत. त्यामुळे या गोष्टीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये. ऑक्सिजनसाठी लवकरात लवकर तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन मिळायलाच हवा. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.