रत्नागिरी - गेल्या ५ वर्षात खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला काडीचीही किंमत दिली नाही, उलट त्यांनी भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर सतत टीका केली. त्यामुळे आम्ही राऊत यांचा प्रचार करणार नाही. राऊत यांच्या ऐवजी सुरेश प्रभू आम्हाला उमेदवार हवेत, अशी जोरदार मागणी भाजप कार्यकर्त्यांनी रत्नागिरीच्या बैठकीत केली.
सिंधुदुर्ग पाठोपाठ आता रत्नागिरीतसुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांची खदखद समोर आली. शिवसेना आणि भाजप युती झाली असली, तरी सेनेच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याचे संकेत जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील शिवसेनेविरोधातील राग व्यक्त केला.
युती असताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी ५ वर्षात भाजपला सापत्न वागणूक दिली. भाजपच्या नेत्यांविरोधात सतत वादग्रस्त वक्तव्य केली, यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला साथ देणार नाही, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतली. तसेच हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. केंद्रीय हवाई मंत्री सुरेश प्रभू यांना या मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली.
कार्यकर्त्यांच्या भावना आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबतही मी बोलेन आणि लवकरच यातून मार्ग काढू, असे आश्वासन प्रसाद लाड यांनी कार्यकर्त्यांना दिले.या बैठकीला लाड यांच्यासह, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर आळवल्याने सेनेला ही निवडणूक सोपी नसणार आहे.