मुंबई : उद्धव ठाकरे आज बारसूचा दौरा केला. बारसू रिफायनरीवरुन राजकारण तापलं असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा दौरा केला. राजापूर तालु्क्यातील नागरीक रिफायनरीला रिफायनरीचा कडाडून विरोध करत आहेत. कोकणाच्या पर्यावरणाची हानी होणार असल्याने स्थानिक नागरिक प्रकल्पाला विरोध करत आहेत. विरोधी पक्षदेखील नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. या रिफायनरीच्या विरोधामागील आणखी कारण म्हणजे तेथील कातळशिल्प. हा या रिफायनरीचा सर्वात मोठा अडथळा. काय आहे कातळशिल्प?, काय आहे त्याचा इतिहास? या प्रश्नाची सर्वांची उत्तरे मिळण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत..
- काय आहे कातळशिल्प : कातळशिल्प म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, या कातळशिल्पांना खोदशिल्प म्हटले जाते. जगभरात याला रॉक आर्ट, पेट्रोग्लिप्स किंवा जिओग्लिप्स असे म्हटले जाते. हे डोंगरमाथ्यावरील खड्यावर कोरलेली शिल्प आपल्या युगातील कथा सांगणारी आहेत. आदिमानवाने विविध चित्रे दगडात कोरुन ठेवलेली आहेत. विविध प्राणी,पक्षी तसेच काही नक्षीकाम असलेले चित्रे यात आहेत. पण हे चित्रे नक्की काय सांगतात, हे सांगणे जरा अवघडच आहे. पण हा अश्मयुगातील अनमोल ठेवा असून हे रिफायनरीमुळे संकटात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका वृत्तानुसार हे कातळशिल्प १९९० मध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथे रस्त्याचे काम करताना जांभ्या दडगाच्या सड्यावर आढळली होती.
- इतिहास उलगडणार: रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा,राजापूर,देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील ५० गावांमध्ये अशी शिल्पे आहेत. त्यातील राजापूर तालुका येथील देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे, गोठणे, बारसू, आणि पन्हाळे, शेडे, कोतापूर, देवीहसोळ या गावात हे शिल्प आहेत. हे शिल्प इतिहासातील महत्त्वाचा दस्तऐवज मानले जात आहेत. त्यामुळे इतिहासातील अजून काही पाने आपल्या समोर येतील.
- निर्माण करण्याचे कारण काय? : हे शिल्प कशासाठी निर्माण करण्यात आली आहेत. याबद्दलचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. पण त्यावर संशोधन चालू आहे. दरम्यान कोकणातील महत्वाच्या ठिकाणी हे शिल्प आढळून आल्याने आदिमानवाची वस्ती येथे होती का याची माहिती मिळू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. दरम्यान कोकणातील दोन जिल्ह्यात मिळालेल्या या शिल्पांची गणना केल्यास याची संख्या ही साधरण 1700 वर असेल. कोकणाचा मानव इतिहास पाहिला तर तो आपल्याला सातवहन काळातील दिसतो. परंतु त्यापूर्वीच्या इतिहासाचे पुरावे नाहीत. कोकण आणि महाराष्ट्रात पाषणयुगाचे काही पुरावे आहेत. या दोन्ही काळात साधरण ४५ हजार वर्षाचे अंतर आहे. कोकणातील कातळशिल्पे हे त्या दोन्ही काळामधील दिसत आहेत. विशेष म्हणजे या शिल्पांमध्ये कोकणात न दिसणारे प्राणीदेखील आहेत. तर हे चित्रे कशाच्या साहाय्याने कोरली गेली आहेत. का बनवली गेली आहेत, या काळात हत्याराचा शोध लागला होता का? या प्रश्नांनी पुरातत्वशास्त्रज्ञ, इतिहासकारांच्या मनात काहूर माजवले आहे. या चित्रांमधील मानव शेती करताना दिसत नाही. तसेच हे शिल्प करण्याचे कौशल्य हे पिढ्यापिढ्या होते. कारण हे शिल्प वेगवेगळी आहेत. यावरुन ही कला प्रत्येक पिढीला येत असावी, असा अंदाज लावला जात आहे.
- काय आहेत वैशिष्ट्ये: कोकणात आणि इतर ठिकाणी आढळून आलेली कातळशिल्पे हे वेगवेगळ्या प्रकारची आहेत. इतर ठिकाणी आढळलेली चित्रे हे कोकणातील चित्रांच्या तुलनेत मऊ दगडात कोरली आहेत. तर कोकणात आढळेलेली चित्रे कठीण दगडावर कोरली आहेत. यामुळे त्याच्यावर वातावरणाचा कोणताच परिणाम झालेला नाही. हे शिल्प कातळाच्या जमिनीवर कोरल्या गेल्या आहेत.खोदलेल्या आकृती या प्रत्यक्षातील प्राण्यांच्या आकारासारख्या आहेत. कोकणातील कातळ शिल्प हे भारतात इतर ठिकाणी आढळलेल्या चित्रांपेक्षा मोठे आहेत. दरम्यान जे प्राणी कोकणात आढळत नाहीत, ते प्राणी देखील या चित्रांमध्ये आहेत. येथील चित्र हे पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया येथील शिल्पासारखी दिसतात.
- कातळशिल्पवर रिफायनरीचे संकट: रत्नागिरीमधील राजापूर तालुक्यातील बारसू भागात रिफायनरी होणार आहे, त्याच भागात हे कातळशिल्प आढळून आली आहेत. सड्यावरील जांभ्या खडकांवर हे शिल्प कोरण्यात आली आहेत. परंतु या रिफायनरी झाल्यानंतर हे शिल्प नष्ट होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिफायनरीची नवीन जागा बारसू, सोलगाव, गोवळ या पट्ट्यात प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याच पट्ट्यातील बारसूच्या सड्यावर 175 कातळशिल्प आहेत. साधरण 20 हजार वर्षापूर्वीचे हे शिल्प आहेत. वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये कातळशिल्पचा समावेश केला जाणार आहे. पण रिफायनरी या जागेवर येणार आहे त्याच पट्ट्यात हे कातळशिल्प असल्याने इतिहासाची काही नवीन पाने समोर येणार की रिफायनरीमध्ये दबली जाणार याविषयी शंका आहे. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार रिफायनरी होण्यासाठी आग्रही आहेत, पण या अश्मयुगीन कातळशिल्पचे काय होणार याविषयी काही म्हटलेले नाही. त्यामुळे या रिफायनरीमुळे आदीमानवाची कथा सांगणारे हे शिल्प नष्ट होणार असल्याची भीती पुरातत्वशास्त्रज्ञ, इतिहास तज्ञ, कलाइतिहासकार यांना वाटू लागली आहे. आदिमानवांनी तयार केलेली शिल्पे लवकर राज्य संरक्षित स्मारके होतील आणि भविष्यात जागतिक वारसास्थळ म्हणून त्यांना मान्यता मिळेल असे वाटत होते. पण रिफायनरीमुळे हे अश्मयुगीन शिल्पे नष्ट होतील, अशी भीती आहे.
- रिफायनरीला विरोध का?: कोकणवासियांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.राजापूरमध्ये आधी प्रस्तावित असलेल्या या रिफायनरीला बारसूमध्ये 13 हजार एकरची जमीन देण्याचे ठरले होते. परंतु या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बारसूमधील मच्छीमारांसमोर रोजगारीची समस्या निर्माण होणार आहे.
- उद्धव ठाकरेंचा प्रकल्पाला विरोध : बारसू प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीक केली आहे. विशेष या जागी प्रकल्प करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सुचवले होते. परंतु आता त्यांच्याकडून विरोध केला जात आहे. स्थानिकांचा विरोध असताना सरकारने येथे प्रकल्प करू नये, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. चांगले प्रकल्प हे गुजरात नेले जात आहेत आणि विनाशकारी प्रकल्प हे महाराष्ट्राला दिले जात असल्याचं ठाकरे म्हणालेत.
- कातळशिल्प प्रकल्पात जाणार नाही: भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणार असतील तर प्रकल्प हवे आहेत, पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर असे प्रकल्प नको. आम्ही विकासाच्या आड येणार नाही,पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर त्याला आमचा विरोध असल्याचे उद्धव ठाकरे म्हणालेत. सोलगाव जवळील कातळशिल्पाची आज उद्धव ठाकरेंनी पाहणी केली असता हे शिल्प आपण प्रकल्पात जाऊ देणार नाही, तसेच संवर्धनासाठी युनेस्कोला पत्र लिहिले होते असे उद्धव ठाकरे म्हणालेत.