रत्नागिरी - सरकारच्या कामगारहितविरोधी धोरणांच्या विरोधात आणि खासगीकरणाच्या धोरणाविरोधात राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला रत्नागिरीतही चांगला प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीत मारुतीमंदिर जवळील बँक इंडिया समोर बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. 3 कर्मचारी संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या, तसेच जवळपास 600 ते 650 कर्मचारी या संपात सहभागी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा बँक कर्मचारी समन्वय समितीचे सरचिटणीस राजेंद्र गडवी यांनी दिली. तसेच आजचा बँक कर्मचाऱ्यांचा संप पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा बँक कर्मचाऱ्यांच्या स्थानिक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.
आत्मनिर्भर भारताच्या नावाखाली सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करुन त्या बड्या कॉर्पोरेट्सना विकण्याचे षडयंत्र राबविले जात आहे, असा आरोप करत याला विरोध म्हणून आजचा हा संप राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला होता. देशभरातील ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (ए.आय.बी.ई.ए.) जवळपास पाच लाख सभासद तसेच महाराष्ट्र राज्यातील जवळपास तीस हजार कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले होते. सर्व प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी रकारच्या शेतकरीहितविरोधी व जनहितविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी हा संप पुकारला होता. संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात एकूण २७ कामगार कायद्यांचे रुपांतर त्यामध्ये घातक बदल करुन एकूण ३ नवीन कायदे पारित करण्यात आले. यामुळे देशातील जवळपास ७० टक्के कामगार कर्मचारी कामगार कायद्यातील सुरक्षिततेच्या परीघाबाहेर गेले आहेत. तसेच संपूर्णपणे मालकधार्जिणे धोरण या कायद्याने देशामध्ये निर्माण झाले आहे, असा आरोप या सर्व केंद्रीय कामगार संघटनां या आंदोलना वेळी केला आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या-
बँक कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये खासगीकरणाच्या विरोधाबरोबरच बड्या कॉर्पोरेटसची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी कठोर उपाय कराव्यात. तसेच बँकांमध्ये आवश्यक तेवढी नोकरभरती करावी, ठेवींवरील व्याजदर वाढवावेत, यांसह अन्य मागण्याही या संपात केल्या आहेत. देशामधील खासगी बँकाचा आजवरचा इतिहास पाहता विशेषकरुन अलीकडील येस बँक घोटाळा किंवा लक्ष्मी विलास बँक वरील निर्बंध यावरुनच खासगी बँकांतील ठेवी किती सुरक्षित राहतील हा प्रश्न आहे. म्हणून बँका ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातच राहणे आवश्यक असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी मांडले आहे. त्यामुळे रत्नागिरीतही बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या संपामुळे राष्ट्रीयकृत बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प होते.