रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यापैकीच एक रिक्षा व्यवसाय. या रिक्षा व्यवसायावर हजारो जणांचे पोट अवलंबून आहे. रोजच्या कमाईवरच कुटुंबाचा गाडा अनेक रिक्षा व्यावसायिक हाकत असतात. ही सर्व कुटुंब सध्या उपासमारीचा सामना करत आहेत.
काहींनी तर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच नवीन रिक्षा खरेदी केली मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे गेले 45 दिवस रिक्षा व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, रिक्षाचे कर्ज कसे फेडायचे अशी अनेक आव्हाने या रिक्षा व्यवसायिकांसमोर निर्माण झाली आहेत.
रत्नागिरी शहरातील प्रमोद वायंगणकर हे अशांपैकीच एक रिक्षा व्यवसायिक. गेली अनेक वर्षे ते रिक्षा व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. वायंगणकर यांचे 4 जणांचे कुटुंब. त्यांचा एक मुलगा इंजिनिअरिंग करतोय, तर दुसरा आठवीला आहे. रिक्षा व्यवसायावरच मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मार्च महिन्यात प्रमोद वायंगणकर यांनी दोन लाखांचे कर्ज काढून नवीन रिक्षा घेतली. त्यानंतर नवीन रिक्षावर जेमतेम 10 दिवस व्यवसाय केला आणि त्यानंतर सुरू झाले लॉकडाऊन.
आज 45 दिवस उलटून गेलेत, लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे प्रमोद वायंगणकरांच्या सर्वच स्वप्नांवर पाणी फिरले आहे. कर्जाचा दर महिन्याचा हप्ता पाच हजार रुपये आहे, पण व्यवसायच ठप्प झाला आहे. त्यामुळे एकही हप्ता अद्याप फेडलेला नाही. हाताशी असलेला पैसाही संपला आहे. त्यामुळे, कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यांच्याप्रमाणे अनेक रिक्षा व्यवसायिक रिक्षा व्यवसाय कधी सुरु होणार, याकडे डोळे लावून बसले आहेत. एकूणच रिक्षा व्यावसायिक सध्या संकटात सापडले आहेत. दरम्यान याच संदर्भात रिक्षा व्यावसायिक प्रमोद वायंगणकर यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.