रत्नागिरी - 50 हजारांच्या खंडणीसाठी शहरातील नॅशनल मोबाईलचे दुकान मालक यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्लात ज्या पिस्तूलचा वापर करण्यात आला होता, ती पोलिसांनी जप्त केले आहे. 21 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला होता. नॅशनल मोबाईलचे मालक मनोहर ढेकणे यांच्यावर हा हल्ला झाला होता.
मनोहर ढेकणे हे आठवडा बाजार येथील आपले दुकान बंद करून बंदर रोड फडके उद्यान नजिकच्या अपार्टमेंटमधील आपल्या घरी जात होते. यावेळी चारचाकी गाडीतून आलेल्या सचिन जुमनाळकर याने ढेकणे यांच्याकडे पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी केली. एवढे पैसे देणे मला शक्य नाही, असे सांगत ढेकणे यांनी खंडणी देण्यास नकार दिला. या रागातून सचिन जुमनाळकर याने ढेकणे यांच्या पोटात गोळी झाडली. त्यानंतर तो कारमधून फरार झाला होता. यानंतर फरार झालेल्या आरोपी जुमनाळकरला रत्नागिरी पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आले होते.
हेही वाचा - महिलांवरील अत्याचाराला भाजप सरकारच जबाबदार, गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून बॅनरबाजी
दरम्यान, गोळीबार केल्यानंतर सचिन जुमनाळकर याने पळून जाण्यापूर्वी हातखंबा येथील पोलीस वाहतूक मदतकेंद्राआधी असलेल्या पुलाखाली रिव्हॉल्व्हर लपवून ठेवले होते. पोलिसांनी सचिनला अटक केल्यानंतरही त्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल कुठे आहे, हे सांगत नव्हता. अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यावर ते कुठे ठेवले आहे, ते दाखविले. कर्नाटकला पळून जाण्यापूर्वी त्याने हातखंबा येथे पुलाखाली गावठी पिस्तुल लपवून ठेवल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी तेथून हे पिस्तूल जप्त केले आहे. पुढील तपास सुरू आहे.