रत्नागिरी - येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या वाढत्या पाठिंब्याला आणखी बळ मिळाले आहे. कारण रत्नागिरी रिफायनरीच्या उभारणीसाठी सौदी अरेबियातील अराम्को कंपनी आजही बांधील आहे, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. अशोक यांनी दिली. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यामुळे या प्रकल्पाला समर्थन असलेल्या समर्थकांना आणखी बळ मिळाले आहे.
गेले काही दिवस रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाली असली तरी हा प्रकल्प याच भागात व्हावा, यासाठी समर्थन वाढत आहे. शिवसेनेतीलही अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रकल्पाच्या बाजूने आहेत.
रत्नागिरी रिफायनरीमध्ये 44 दक्षलक्ष डाॅलर्सची गुंतवणुक असलेला हा प्रकल्प आहे. गेले काही दिवस कमी होणाऱ्या कच्चा तेलाच्या किंमतीमुळे रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत अराम्को कंपनीची भूमिका महत्वाची होती. कोरोनाचे संकट आणि कमी होणाऱ्या तेलाच्या किंमती यामुळे अराम्को कंपनी यातून काढता पाय घेते कि काय? अशी शक्यता वर्तवली जात होती. हा प्रकल्प 60 दक्षलक्ष टन क्रुड ऑईलची उलाढाल करण्याची क्षमता असणारा प्रकल्प असणार आहे. सौदीची सर्वात मोठी तेल कंपनी अराम्को या प्रकल्पाला 50 टक्के गुंतवणुक करणार आहे. या प्रकल्पासाठी अराम्को कंपनी कटीबद्ध असल्याच्या विधानामुळे प्रकल्प समर्थकांना आणखी बळ मिळणार आहे.