रत्नागिरी- शिवसेना आमदार संपर्कात असल्याचे विधान करणाऱ्या भाजप खासदार संजय काकडे यांच्यावर शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि टेंडर मिळतील, या आशेने त्यांना खूश ठेवण्यासाठी आणि शिवसेना आमदारांना बदनाम करण्यासाठी संजय काकडे यांनी हे वक्तव्य केले असल्याचा पलटवार सामंत यांनी केला आहे.
शिवसेनेचे ५६ पैकी ४५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. यावर शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी जोरदार पलटवार केला आहे. काकडे यांनी स्वतः एका पक्षात स्थिर राहावे, असा सल्ला उदय सामंत यांनी त्यांना दिला आहे. शिवसेनेचे आमदार काकडेंनी बोलण्याएवढे कमजोर नाहीत. आमची निष्ठा बाळासाहेबांच्या विचारावर आणि उद्धवजींच्या नेतृत्वावर आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या निष्ठेवर बोलून काकडेंनी स्वतःची राजकीय अपरिपक्वता सिद्ध केल्याची टीका सामंत यांनी केली आहे.
हेही वाचा- वादळाचा धोका टळल्यानंतरही मासेमारीवर परिणाम; मच्छिमारांना 30 ते 40 कोटींचा फटका