रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटक चिटणीस विष्णु आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत अनेकवेळा संबंधित विभागाशी संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चा केल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले असल्याचे विष्णु आंब्रे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमध्ये प्रामुख्याने डिसेंबर महिन्याचे मानधन त्वरीत देण्यात यावे, केरळ, आंध्र, तेलंगणा, हरियाणा आदी राज्यांपेक्षा जास्त मानधन महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावे. मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून देण्यात यावी. जून २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे अंगणवाडी केंद्राचे भाडे सुधारीत करण्यात यावे. ५ जुलै २०१८ च्या शासकीय आदेशानुसार प्रधानमंत्री जीवनज्योती, प्रधानमंत्री सुरक्षा, अंगणवाडी कार्यकर्ती विमा इत्यादी विमा योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यंतच्या मानधनवाढीच्या फरकाची रक्कम त्वरीत देण्यात यावी. रिक्त जागांवर मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीसांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी. अंगणवाडी सेविकांना नियमित अंणवाडी सेविकांएवढे मानधन देण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांना नियमित अंगणवाडी सेविकांचा दर्जा, वेतन आणि सेवेचे फायदे देण्यात यावे या मागण्या आहेत.
हेही वाचा - 'शिवभोजन'ला बोगस लाभार्थ्यांचं ग्रहण, ठेकेदाराचीचं माणसं घेत आहेत लाभ
एप्रिल २०१४ च्या शासकीय आदेशानुसार मृत्यू झालेल्या, सेवा समाप्त केलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचा लाभ त्वरीत देण्यात याव. पीएफएमएस प्रणालीमध्ये ज्यांचा समावेश झालेला नाही, त्या अंगणवाडी सेविकांना मार्च महिन्यापासून थकीत मानधन देण्यात यावे, इत्यादी मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान, जिल्हा व प्रकल्प कार्यालयाच्या अनास्थेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची वर्षानुवर्षे सोडवणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी राजेश सिंह, रश्मी म्हात्रे, दिनकर म्हात्रे, भगवान दवणे, नफिसा नाखवा आदि कर्मचारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - विदेशी पर्यटकांनी भारतीयांसमोर ठेवला अनोखा आदर्श