रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेला भाजपनेही साथ दिली आहे. जिल्हा बँक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चार प्रमुख पक्षांनी एकत्र येत सर्वपक्षीय सहकार पॅनेल जाहीर केलं आहे. पॅनेलचे प्रमुख आणि जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी हे सर्वपक्षीय सहकार पॅनेल जाहीर करतानाच 21 उमेदवारांची नावेही घोषित केली. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. सहकारात राजकारण नको या हेतूने हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत अशी प्रतिक्रिया चोरगे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होतेय
सहकारात राजकारण नको या हेतूने प्रेरीत होऊन प्रतिकुल राजकीय परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यात आदर्शवत प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आला आहे, अशी माहितीही बँकेचे अध्यक्ष आणि पॅनलचे प्रमुख डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांच्यासह अन्य सर्व संचालक उपस्थित होते. दरम्यान, एकूण 21 जागांपैकी राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 6, काँग्रेस 3 आणि भाजपला 2 जागा देण्यात आल्या आहेत.
भाजप दोन जागांवर समाधानी - ऍड. दीपक पटवर्धन
सहकार पॅनलमध्ये सहभागी होण्यासंदर्भात भाजपच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष आणि बँकेचे विद्यमान संचालक अॅड. दिपक पटवर्धन यांनी यावेळी सांगितले. सहकार पॅनलमध्ये दोन जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यावर आम्ही पूर्णतः समाधानी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
सहकार पॅनलचे उमेदवार
डॉ. तानाजी चोरगे, बाबाजी जाधव, शेखर निकम, रमेश दळवी, राजेंद्र सुर्वे, जयवंत जालगावकर, दिनकर मोहीते, सुरेश कांबळे, रामचंद्र गराटे, दिशा दाभोळकर, सुधीर कालेकर, आदेश आंबोळकर, गणेश लाखण, अनिल जोशी, गजानन पाटील, नेहा माने, संजय रेडीज, मधुकर टिळेकर, महादेव सप्रे, अॅड. दिपक पटवर्धन, अमजद बोरकर यांना सहकार पॅनलतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा - दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच! मात्र आपली 'राजकीय ईस्ट इंडिया कंपनी' झोपेत;'सामना'तून केंद्र सरकारवर प्रहार